वाशीम - तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्ह्यातील बँकांमध्ये सोमवारी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांमधील गर्दीच्या या उच्चांकाने कोरोना नीचांकी पातळीवर कसा येईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे नियोजन कोलमडल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे.
खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत तसेच बँकांसमोर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्राशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तथापि, गर्दी कमी होत नसल्याचे पाहून ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत.