वाशिम: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या १८ वर्षाच्या आतील बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस म्हणाले आहेत. जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासोबतच त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे, तसेत योग्य प्रकारे संगोपन करण्याची कारवाई करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठीत जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा शोध घ्यावा
१८ वर्षाच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी, अन्य जिल्हयातील जिल्हा शल्य चिकित्सकांशी समन्वय साधून पार पाडावी, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले आहेत. जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आणि शहरी भागातील नगरपालिकांनी, कोरोनामुळे पालक गमावुन अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी योग्य प्रकारे सर्व्हेक्षण करुन त्या बालकांचा शोध घ्यावा. नगरपरिषदेकडे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नोंद असल्याने, त्या कुटूंबाचा शोध घेवून, १८ वर्षाच्या आतील बालके अनाथ झाली असल्यास माहिती संकलीत करुन माहिला व बाल कल्याण विभागाला द्यावी. तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या कुटूंबांची भेट घेवून माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले आहेत.
महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन द्यावा
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने बालकांचा व महिलेचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगार उपलब्ध करुन द्यावा. कोरोनामुळे आई-वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, अशा बालकांची नावे व यादी तातडीने तयार करावी. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे सोईचे होईल. गावपातळीवर अनाथ बालकांचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेने योग्य प्रकारे काम करावे, असे ते म्हणाले.