महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल - मुख्यमंत्री ठाकरे

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत राज्यातील आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती करणार आहेत. याच मोहिमेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी अमरावती विभागाचा आढावा घेतला.

My family, my responsibility'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Sep 27, 2020, 6:31 AM IST

वाशिम: कोरोनाविरुद्ध लढा देताना आरोग्य सुविधेवर ताण येवू नये, यासाठी कोरोना संसर्गाच्या वेगावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभागाची गरज असून, या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून जनजागृती करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शंभुराज देसाई - पालक मंत्री वाशिम
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’, घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांमध्ये करावयाच्या जनजागृती आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. या बैठकीला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरिक्षक कृष्णकुमार मिना उपस्थित होते.
अमरावती विभाग आढावा बैठक
वाशिम येथून जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. हाके, डॉ. मेहकरकर यांच्यासह जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सध्या आहे त्या रुग्णसंख्यापेक्षा दुप्पट रुग्णसंख्या झाल्यास आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येणार आहे. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून कोरोनासह इतर आजाराचे रुग्ण शोधण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती ॲपद्वारे तात्काळ भरावी. त्यामुळे या सर्वेक्षणाची अंमलबजावणी दक्षतापूर्वक होत असल्याची खात्री होईल. मास्कचा वापर, परस्परांमध्ये शारीरिक अंतर राखणे, तसेच वारंवार हात धुणे या सवयी आता अंगीकाराव्या लागतील. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

नो मास्क नो एन्ट्री; जिल्हा स्तरावर कोरोना केअर सेंटर

राज्यातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी अनेक क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संसार्गात वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली जबाबदारी कळण्यास मदत होईल. ही मोहीम नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कार्य करीत आहे. राज्यस्तरावरही या मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील ‘नो मास्क, नो सवारी’ तसेच कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ या सारखे उपक्रम राबविले जात आहेत. इतर जिल्ह्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खाटांची संख्या, ऑक्सीजन, औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानंतरही आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी तयारी करण्यात येईल. सध्या अनलॉक ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे काम करणारा तरुण वर्ग घराबाहेर पडेल. त्यांच्या माध्यमातून हा व्हायरस घरात जाऊ शकेल. त्यामुळे घरातील वयस्कर लोकांना याची लागण होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची सुरक्षा बाळगावी.

दिवाळीपर्यंत खबरदारी घ्यावी लागेल-

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत तरी प्रत्येक नागरिकाला खबरदारी घ्यावी लागेल. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे सैनिक होऊन कोरोनाविरुद्ध लढावे लागेल. शासनालाही आरोग्यविषयक सुविधा निर्माण करताना सीमारेषा आखावी लागेल. तसेच आवश्यक असलेल्या औषधे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्यावे लागेल. सध्यातरी कोरोनाची लस उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. या लसी उपलब्ध झाल्यानंतरही त्याची परिणामकारकता किती असेल, याबाबतही चर्चा होत आहे. तसेच लसीकरणाची मोहीम किती वेळ चालेल, याबाबतही विचार करावा लागणार आहे.

कोरोनाविरूद्धच्या या मोहिमेत आता प्रत्येक नागरिकांना आपली जीवनशैली बदलावी लागेल. मास्क, हात धुणे, अंतर राखणे यामुळे कोरोनाच्या प्रसाराला शाळा घालण्यास मदत होत आहे. त्यामुळे या त्रिसूत्रीचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा. नागरिकांना समजेल अश्या बोली भाषा आणि स्थानिक लोककलावंताच्या मदतीने ही मोहीम गावागावात पोहोचता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जिल्ह्यात १६ सप्टेंबर पासून मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा मोहिमेत सहभाग असून प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक घरापर्यंत जावून जनजागृती करण्यात येईल. मास्कच्या वापराबाबत जनजागृतीवर भर दिला जात आहे, त्याचबरोबर मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असून याकरिता जिल्हा नियोजन समितीद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी मोहिमेच्या अंमलबजावणी विषयी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य विभागाची पथके घरोघरी जावून सर्वेक्षण करीत आहेत. यामाध्यमातून कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात आहे. त्याचबरोबर बॅनर, होर्डिंग, समाज माध्यमांद्वारे मोहिमेविषयी प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून स्वयंशिस्त पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details