वाशिम- शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसाने या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. नगर परिषदेने याकडे त्वरीत लक्ष देऊन निदान रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाटणी चौक ते अकोला नाका हा शहरातील महत्वाचा रस्ता असून दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, पोलीस अधीक्षक कार्यालय, राजस्थान महाविद्यालय आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मात्र, रस्त्यावर खड्डे पडल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे.