वाशिम - कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रत्येक दुकानदार, व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार नाही. चाचणी अहवाल नसणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची आणि व्यापाऱ्याची हयगय केली जाणार नसल्याचा इशारा कारंजा नगरपरिषेदेकडून देण्यात आला.
कोरोना चाचणी न केल्यास व्यवसाय करता येणार नाही कोरोना विरोधी पथकाची मोहीम -
कांरजा शहरात कोरोना पथक तयार करून लाऊडस्पीकरव्दारे व्यापक जनजागृती केली जात आहे. याला कारंजा शहरातील व्यावसायिकांचा आणि नागरिकांचा काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जे व्यावसायिक कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांची गय केली जाणार नसल्याचे कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हाकर यांनी सांगितले. कोरोना विरोधी पथकांनी शहरातील कापड दुकाने, औषध दुकाने, भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडी चालक, दूध डेअरी, पीठगिरणी, सलून, हॉटेल, जनरल स्टेअर्स इत्यादी दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांनी त्यामधील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे तसे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले. अन्यथा व्यवसाय करता येणार नाही व आपत्कालीन व्यवस्थापन नियमानुसार करावाई करण्यात येईल, अशा इशारा दिला.
मालेगावात पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण -
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे यातील तिघांनी कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला होता. सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र, कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या वेळेस कुणीतरी संपर्कात आल्याने या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचीही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसत आहे.