महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परराज्यातील मजुरांना अंध कलावंतांनी दिला मदतीचा हात

लॉकडाऊनमुळे हातावर काम करणाऱ्या मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

lockdown in washim
परराज्यातील मजुरांना अंध कलावंतांनी दिला मदतीचा हात

By

Published : Apr 9, 2020, 11:46 PM IST

वाशिम - लॉकडाऊनमुळे हातावर काम करणाऱ्या मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था तर झालीय; मात्र, त्यांचा पोटाचा प्रश्न कायम होता. या मजुरांची माहिती मिळताच मदतीसाठी चेतन सेवांकुरच्या अंध कलावंतांनी मदतीचा हात पुढे केला. या मुलांनी कुंभारखेडा येथे मजुरांना धान्य व आर्थिक मदत दिली.

परराज्यातील मजुरांना अंध कलावंतांनी दिला मदतीचा हात
वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा येथे एका पुलाच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगड राज्यातील जवळपास 25 मजूर आले होते. त्यांचे काम सुरळीत सुरू होते. मात्र, लॉकडाऊनमुळे या मजुरांना काम थांबवावे लागले; आणि त्यातच ठेकेदार सुद्धा आपल्या राज्यात निघून गेल्याने मजूर याच ठिकाणी अडकून राहिले. यानंतर त्यांच्या अन्नाचा प्रश्न उभा राहिला.

यानंतर कुंभारखेडा येथील पोलीस पाटील नामदेव ठाकरे यांनी त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली. मात्र, खाण्यापिण्याचा प्रश्न कायम होता. या मजुरांची माहिती चेतन सेवांकुरचे संचालक पांडुरंग उचीतकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गहू, तांदूळ , डाळ व काही आर्थिक मदत पोहोचवली. यावेळी अंध कलावंत चेतन उचीतकरच्या हस्ते मदतीचे वितरण करण्यात आले. ऐन गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीमुळे ते मजूर कृतकृत्य झाले. या मदतीमुळे त्या मजुरांच्या काही दिवसांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली असली तरी त्यांना आणखी मदतीची गरज आहे. आमच्याप्रमाणेच इतरांनीही या मजुरांना मदत करावी, असे आवाहन चेतन उचीतकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details