वाशिम - कारंजा तालुक्यातील पोघात येथे आगे मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात १३ मजुर जखमी झाले आहेत. ( Bee Attack Poghat Washim ) तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये ५ महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात ( Karanja Civil Hospital ) दाखल करण्यात आले आहे.
हे सर्व हमीद पाटील यांच्या शेतात हरभरा सोंगणीचे काम करित होते. शेतमालक जेवण करण्यासाठी बांधावरील झाडाखाली बसले तेव्हा झाडावर असलेल्या आगे मधमाशांनी अचानक हल्ला चढविला. यासोबतच हरभरा सोंगणीचे काम करणाऱ्यावर देखील हल्ला चढविला. यामध्ये 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती, १०८ रुग्णवाहिकेचे वाहक चंद्रकांत मुखमाले यांनी तत्काळ साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्यांना दिली. माहिती मिळताच पथकाचे सदस्य अनिकेत इंगळे व बुध्दभुषण सुर्वे आदि सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर १०८ रुग्णवाहिनीने सर्व जखमींना घेऊन कारंजा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले.