वाशिम - जिल्ह्यातील मोरगव्हाण येथील आदर्श एकत्र कुटुंब म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग कोकाटे, आत्माराम कोकाटे, बद्रिनारायण कोकाटे या कुटुंबाने यावर्षी आपल्या घरी झाडाच्या गणपतीची स्थापना केली आहे. या कुटुंबातील सदस्य तथा वृक्षप्रेमी विलास कोकाटे यांची मुलगी पूर्वजा कोकाटे हिने निसर्ग शाळेच्या अंतर्गत घरच्या घरी रोपवाटिका तयार करून, आपल्या रोपवाटिकेतील फळझाडांचा उपयोग करून यावर्षी झाडाचा गणपती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
रोपवाटिकेतील फळझाडांचा उपयोग करून साकारले बाप्पा निसर्ग शाळेची संकल्पना -
चिमुकल्या पूर्वजाचा आदर्श उपक्रम निसर्ग शाळेच्या माध्यमातून झाडाचा गणपती ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. पूर्वजा हिने ही 'झाडे वाचवा-जीवन वाचवा, वृक्षतोड करू नका-जीवन धोक्यात टाकू नका, झाडे लावा, पर्यावरण वाचवा, मी झाडातच आहे' असे संदेश देखाव्यामध्ये साकारले आहेत. तसेच अष्टविनायकांच्या नावांना आठ देशी झाडांची नावे देऊन वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. फळझाडांसोबतच शाडूच्या गणपतीची मूर्ती देखील साकारण्यात आली आहे.
शेतात झाडे लावून गणपतीचे विसर्जन -
गणेश मूर्तीला तिने स्वतः नैसर्गिक रंग देऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली आहे. झाडाच्या गणपतीचे विसर्जन हे आपल्या शेतात झाडे लावून केले जाणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन, फळे, आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल व तोच खरा गणपतीचा आशीर्वाद असेल असे पूर्वजा कोकाटेने सांगितले. पूर्वजा कोकाटेला झाडाचा गणपती साकारण्यात निसर्ग शाळेचे संस्थापक आण्णासाहेब जगताप, गजानन कोकाटे, वृक्षप्रेमी विलास कोकाटे, विश्वास कोकाटे व कोकाटे कुटुंबीयांनी मार्गदर्शन केले.