महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : बंजारा समाजाची काशी मानलेल्या पोहरादेवी येथील राम नवमीची यात्रा रद्द

पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. पोहरादेवी येथे देशभरातून लाखो लोक येतात. सध्या काही राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना इफेक्ट
कोरोना इफेक्ट

By

Published : Mar 13, 2020, 8:24 PM IST

Updated : Mar 13, 2020, 9:29 PM IST

वाशिम -बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. मात्र ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यावर्षी, २ एप्रिल २०२० रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.

बंजारा समाजाची काशी मानलेल्या पोहरादेवी येथील राम नवमीची यात्रा रद्द

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १३ मार्च रोजी झालेल्या जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन देवस्थानचे महंत, विश्वस्त यांनी केले.

पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा

पोहरादेवी यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. पोहरादेवी येथे देशभरातून लाखो लोक येतात. सध्या काही राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी पोहरादेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी भाविकांनी यावर्षी रामनवमीला आपापल्या घरीच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करावा. यात्रा रद्द करण्यात आल्याने यावर्षी पोहरादेवी येथे येवून नये. याबाबतचा संदेश देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे प्रतिनिधी महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी यावेळी केले.

लोकांनी एकत्र जमणे टाळावे

कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी लोकांनी एकत्र जमणे टाळणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली एक व्यक्ती आपल्या संपर्कात येणाऱ्या हजारो व्यक्तींपर्यंत या विषाणूचा प्रसार करू शकते. पोहरादेवी यात्रा काळात देशभरातून, विविध राज्यातून लाखो भाविक येतात. महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यांमध्येही सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण पोहरादेवी येथे लाखोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या भाविकांच्या संपर्कात आल्यास या विषाणूचा संसर्ग इतर भाविकांना होण्याची भीती आहे. त्यामुळे यावर्षी २ एप्रिल रोजी पोहरादेवी येथे होणारी यात्रा राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार रद्द करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी देवस्थानचे महंत, विश्वस्त व बंजारा समाजाचे प्रतिनिधी यांना केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी सुध्दा यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका उपस्थितांच्या लक्षात आणून दिला. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. तसेच त्यावरील उपचारासाठी सुद्धा औषध उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे प्रतिनिधी महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी पोहरादेवी येथे २ एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्याच्या निर्णय घेतला. कोरोनाचे संकट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांना बंजारा समाज बांधव सहकार्य करतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, तहसीलदार सुनील चव्हाण, उमरी खु.चे सरपंच क. भा. पवार यांच्यासह बंजारा समाजाचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोहरादेवी येथे मंडप, स्टॉल उभारण्यास मनाई

जिल्हा प्रशासन व पोहरादेवी देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत पोहरादेवी येथे राम नवमीला होणारी यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत मंडप, स्टॉल व शामियाने उभारता येणार नाहीत. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले आहेत. त्यामुळे भाविक व गावातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 13, 2020, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details