वाशिम - विदर्भातील रखरखत्या उन्हात सफरचंदाची बाग फुलली ( Apple farming in Washim ) आहे. प्रवीण ठाकरे या प्रगतीशील शेतकऱ्याने ही किमया करून दाखविली आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापूर्वी त्यांनी चिकू, संत्री, नारळ, टरबूज आदी फळांची यशस्वी शेती केली आहे. आता त्यांनी सफरचंदाची बाग फुलवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पश्चिम विदर्भातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. मुबलक पाणी असलेल्या भागामध्ये शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहेत. या भागात पाण्याचे नियोजन एक मोठा विषय आहे. पण प्रवीण ठाकरे यांनी यशस्वी नियोजन करुन अशक्य हे शक्य करुन दाखवले आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एप्रिलच्या कडक उन्हात सरफचंदाला फळधारणा-वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील चहल गावचे प्रवीण ठाकरे हे प्रगतीशील शेतकरी ( progressive farmer Pravin Thakare ) आहे. त्यांनी आपल्या 35 एकर शेतीवर नवनवीन प्रयोग करत विविध फळबागा फुलवल्या आहेत. त्यात सीताफळ, बारमाही येणारा आंबा, संत्रा, कमी उंचीचे नारळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, टरबूज अशी फळपीके ते घेतात. दोन वर्षापूर्वी नवा प्रयोग म्हणून त्यांनी सफरचंदाचीही लागवड ( Apples Experimental farming ) केली. एप्रिलच्या या कडक उन्हात त्याला फळधारणा होत आहे.
योग्य नियोजनातून 35 एकर शेती हिरवीगार- प्रवीण ठाकरे यांची शेतीही कोरडवाहू भागातीलच आहेत. त्यांच्या शेताजवळ मोठे धरण नाही. तसेच मोठी नदीही नाही, मात्र उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व उत्तम नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपली 35 एकर शेती हिरवीगार केली आहे. पिकाला पाणी देण्यासाठी संपूर्ण ऑटोमेशन सिस्टीम बसविली आहे. त्यामुळे बागेला हवे तेवढेच पाणी, योग्य वेळी, पीएच मेंटेन करून दिले जाते. याच सिस्टीमच्या साह्याने फळझाडांना खतेही दिली जातात. त्यामुळे पाणी, खत आणि वेळाचीही बचत होते. पारंपरिक पिकांऐवजी फळबाग लागवड केली तर खडकाळ शेतीतूनही प्रगती साधता येते, हे प्रवीण ठाकरे यांच्या शेतीतील विविध प्रयोगावरून दिसून येते.