वाशिम- राजा वाकाटकाची राजधानी असलेल्या वत्सगूल्म अर्थात वाशिम जिल्ह्यातील कूपटा गावात ऐतिहासीक शिल्पकलेचा अदभूत असा खजिना सापडला आहे. हा शिल्पकलेचा ठेवा पुरातत्व विभागाने संर्वधन करुन जपण्याची गरज आहे. वाशिम जिल्हा तसा भौगोलीक दृष्टीने डोंगरावर वसलेला जिल्हा आहे. मात्र वत्सगूल्म व आताचे वाशिम हे वाकाटक राजाने आपल्या राजधानीचे ठिकाण केले होते. याचा अर्थ वाकाटकाच्या आधीही हे शहर समृद्ध होते. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन व ऐतिहासीक स्थळे असून त्या पैकीच मानोरा तालुक्यातील लहानशा कूपटा गावात शिल्पकलेचा अद्भूत असा खजिना आढळून आला आहे.
वत्सगुल्म नगरीतील कुपट्यात 'दडला' प्राचीन ऐतिहासीक शिल्पकलेचा 'खजिना' वऱ्हाड प्रांत किवा पूर्वीचा बेरार प्रांत समृद्ध प्रांत ओळखला जायायचा. महाभारतापासून वऱ्हाडाच्या समृद्धीची इतिहासात नोंद आहे. मात्र एखाद्या गावखेड्यात दगडाच्या राशीत प्राचीन ऐतिहासीक शिल्पकलेचा खजिना असेल हे कोणालाही खरे वाटणार नाही. पुरातत्व विभागाने या शिल्पकलेची दखल घेतली नसली, तरी कूपटा गावातील हे वैभव महाभारतकालिन असल्याचा कयास या गावातील गावकरी लावतात.
कूपट्याच्या बाहेर एक यादवकालिन शिवमंदिर असून मंदिरासमोर विस्तीर्ण बारव आहे. या बारवाला दुर्मीळ देवकोष्टके आहेत. तर बारवाशेजारी बाहेरुन दगडाचे दिसणारे केशव मंदिर आहे. बाहेरुन या मंदिराची पाहणी केली, तर एकावर एक दगडाच्या शिळा ठेवल्याचे दिसते. आत मात्र शिल्पकलेचा अद्भूत नजारा पाहवयास मिळतो. या मंदिराचे घुमट अतिशय अप्रतिम असून घुमटाच्या आतील भागावर दगडाच्या वर्तुळाकाराच्या पट्ट्या उतरत्या क्रमाने ठेवण्यात आल्या आहेत. त्या मधोमध गोल दगडावर श्रीकृष्ण गोपीकाचे कोरीव शिल्प आकारलेले आहे.
या मंदिरातील मुख्य मूर्तीची स्थापना नवीन मंदिरात केली आहे. विशेष म्हणजे मेहकरच्या बालाजी प्रति ही केशवमूर्ती सूबक दिसणारी आहे. विदर्भात दगडावर बारीक आकर्षक कलाकूसर असलेले हे दुर्मीळ प्राचीन मंदिर वाशिमच्या वैभवशाली इतिहासाचे साक्ष देणारे ठरले आहे. त्याचबरोबर या केशव मंदिर परिसरात बारव योद्धा शिल्प, विरगळ नृसिंह लक्ष्मी शिल्प, गरूडावर विराजीत विष्णु लक्ष्मी, महिशासूर, भैरवाचा ऐतिहासीक ठेवा विखुरलेला आहे. पुरातत्व विभागाकडे या मंदिराची नोंद नाही. मात्र पुरातत्व विभागाने हा ऐतिहासीक ठेवा अभ्यासला तर या गावाच्या प्राचीन इतिहासाचा उलगडा होऊ शकते, असे मत इतिहास संशोधक प्रा. रवि बाविस्कर यांनी व्यत्क केले आहे.