वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून ते ७ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आज, ३१ मे रोजी नवीन आदेश लागू केले आहेत.
सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
या आदेशानुसार जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ किराणा दुकान, फळे, भाजीपाला विक्रेते, दुध डेअरी, पिठाची गिरणी, मांस, अंडी, मासे विक्रीची दुकाने व रेशन दुकाने ही अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध डेअरी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. तसेच घरपोच दुध वितरणास सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समिती दैनंदिन सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, बँक व्यवसाय प्रतिनिधी, बँक ग्राहक सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु