वाशिम - जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतचे आरक्षण बुधावारी (दि. 3 फेब्रुवारी) जाहीर झाले. यामध्ये 12 ग्रामपंचायतीत आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्याच्या वसारी व राजूरा ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण अनूसूचीत जमाती प्रर्वगाचे निघाले आहे. मात्र, या दोन्ही गावात या प्रर्वगाचा उमेदवारच नसल्याने ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पेच निर्माण झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात 15 जानेवारीला पार पडलेल्या ग्रामपंचायतचे निवडणूकीनंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील वसारी, राजूरा, पांघरी कुटे, शिरसाळा, मारसुळ, वारंगी, रिसोड तालुक्यातील चिचांबा भर, बिबखेड, मोठेगाव, वाशिम तालुक्यातील उकळी पेण तर कारंजा तालुक्यातील सोमठाणा या 12 गावासाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने सरपंचपद कोणाला मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाकडे प्रस्ताव पाठवणार
या संदर्भात तहसीलदार मालेगाव यांना विचारले असता आरक्षण न्यायालयाच्या आदेशानुसारच काढण्यात आले असून, तालुक्यातील वसारी आणि राजुरा येथे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने आम्ही हा प्रस्ताव वरच्या स्तरावर पाठविणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे.