महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : चार तरुणींच्या पुढाकारातून गावात विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाची सुरुवात

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तरुणींनी पुढाकार घेऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेऊन पाचवी ते दहावीच्या 25 विद्यार्थ्यांना दररोज मोफत शिकवण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक अंतराचे भान ठेवून कधी ग्रामपंचायतमध्ये तर कधी आपल्या स्वतःच्या घरी व विद्युत पुरवठा नसेल तर घराच्या छतावर हे शिकवणी वर्ग सुरू आहेत.

शिकवणी वर्ग
शिकवणी वर्ग

By

Published : Oct 28, 2020, 7:27 PM IST

Updated : Oct 28, 2020, 7:56 PM IST

वाशिम : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ग्राम बेलखेड येथील सुशिक्षित चार तरुणींनी पुढाकार घेऊन कोरोनाच्या काळात बंद पडलेल्या शिक्षण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून 15 आगस्टपासून गावातील इयत्ता दहावीच्या मुलांच्या मोफत शिकवणी वर्गास सुरुवात केली आहे. कोरोनाबाबतची खबरदारी पाळत सामाजिक अंतर राखून मुलांना शिक्षणाचे धडे गिरवण्याचे काम या तरुणी करत आहेत.

गावात विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाची सुरुवात

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असल्यामुळे शिक्षण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तरुणींनी पुढाकार घेऊन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेऊन पाचवी ते दहावीच्या 25 विद्यार्थ्यांना दररोज मोफत शिकवण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक अंतराचे भान ठेवून कधी ग्रामपंचायतमध्ये तर कधी आपल्या स्वतःच्या घरी व विद्युत पुरवठा नसेल तर घराच्या छतावर हे शिकवणी वर्ग सुरू आहेत.

'शिक्षक मित्रां'चा पुढाकार -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल नाहीत सोबतच नेटवर्कची समस्याही आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे गावातील तरुण-तरुणींनी शिक्षक मित्र ही संकल्पना राबवून गावातील पाचवी ते सातवी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. यामध्ये शिक्षक मित्र म्हणून आकांक्षा वानखडे, प्रजोती साखरे, राणी वानखेडे, प्रार्थना वानखेडे, या तरुणींनी हा उपक्रम राबवत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कुठल्याही अडचणीला न डगमगता ज्ञान दानाचे त्यांचे कार्य सुरू असून याचे परिसरात कौतुक होत आहे.

एकिकडे शिक्षणाच्या नावाखाली काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात पालकांची लूट होताना दिसते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी ज्ञान दानासाठी केलेले प्रयत्न हे आदर्श ठरताहेत. हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे भाव गावकऱ्यांनी व्यक्त केले आहेत.

हेही वाचा -वाशिममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गा मातेचं शांततेत विसर्जन

Last Updated : Oct 28, 2020, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details