वाशिम - जिल्ह्यात सर्वत्र कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी काळाबाजार वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिममधील कारंजा भागात ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त केले.
ऑक्सिजनचा काळा बाजार सुरू आहे अशी झाली कारवाई -
कारंजा-नागपूर रस्त्यावर बोलेरो पिकअप या गाडीतून एका ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून पिकअप आणि ट्रक जप्त केले. दोन्ही वाहनांमध्ये २९ व २६ ऑक्सिजन सिलिंडर व न्यू हिंदुस्थान एजन्सी दुकानात जमिनीवर एकूण ९ रिकामे सिलिंडर आढळले. रियाज अहमद गुलाम रसुल (रा.झोयानगर, कारंजा)या व्यक्तीच्या नावाने ऑक्सिजन सिलिंडर व्यवसायचा परवाना असल्याची माहिती मिळत आहे. हे सिलिंडर नागपूर येथील ऑक्सिजन इंन्डस्ट्रीज गॅस प्रायव्हेट लिमीडेट येथून खरेदी केले असल्याची माहिती दुकानदाराने दिली. परंतु, तपासामध्ये योग्य ती कागदपत्रे न आढळल्यामुळे स्थानिक गुन्हे पथकाने कारवाई करून ६४ नग सिलिंडर जप्त केले.
पोलिसांनी बोलेरो पिकअप, ट्रक, सिलिंडर असा एकूण १६ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ठाकरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अजकुमार वाढवे, नाईक, चिंचोळकर, भगत, इंंगोले, पो.शि. नागुलकर, राऊत, राठोड यांच्या पथकाने केली.
हेही वाचा -राज्यात 24 तासांत 71 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त