वाशिम - वाशिम जिल्ह्यातील धानोरा (घाडगे) येथे कपाशीच्या बोगस बीटी बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, कृषी विभागाच्या चमूने धाड टाकली. यात 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी संदीप दादाराव थेर याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बोगस बियाणांच्या साठ्यावर धाड
पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एस. मकासरे यांच्या तक्रारीनुसार, धानोरा बु.(घाडगे) येथे बोगस बीटी बियाणे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर घराची झडती घेतली असता एकूण 10 कट्टे आढळून आले. त्यापैकी 9 कट्टे सीलबंद व एक कट्टा खुला होता. त्यामध्ये 492 कापूस बियाणे पाकिटे व कल्याण 111 संशोधित असे लिहिलेली पाकिटे आढळून आली. यातील प्रत्येक पाकिटावर 1200 रुपये किंमत होती. तर त्याचे वजन 450 ग्रॅम असल्याचे आढळून आले. एकूण 492 पाकिटे जप्त करण्यात आली. याची किंमत 5 लाख 90 हजार 400 रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. ही बोगस बियाणांची पाकिटे नंदुरबार येथून आरोपीने आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.