वाशिम - पश्चिम विदर्भात कोरोना संसर्ग वाढत असून, वाशिम जिल्ह्यात मागील दहा दिवसात 18 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे 21 फेब्रुवारीपासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दररोज सायंकाळी 5 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तर, शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत 38 तासांची पूर्ण संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आज(रविवार) सकाळपासून जिल्हात शुकशुकाट पहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात रविवारी दिवसभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे वाहतुकीला परवानगी -
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी असतील. ऑटोरिक्षा वाहनात चालका व्यतिरिक्त दोन प्रवाशांना परवानगी आहे. आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक याबाबत नियोजन करतील.
ही कार्यालये राहणार सुरू -
नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, ते सर्व उद्योग सुरू राहतील. कर्मचारी, कामगारांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्रांच्या आधारे ये-जा करण्याची परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एन. आय. सी., अन्न व नागरी पुरवठा, आयएफसी, एनवायके, नगरपालिका, बँक सेवा वगळून) १५ टक्के किंवा १५ व्यक्तींपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व प्रकारच्या खासगी कार्यालयातील आस्थापना १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई -
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.