वाढीव वीजबिलाविरोधात निवेदन देताना युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते वर्धा : संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलासाठी विरोध केला जात आहे. यात वर्ध्याच्या आर्वीत राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत वीजबिल माफीसाठी कृती समिती स्थापन केली. याच समितीत सहभागी असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या मुख्य मार्गावरील असलेल्या श्यामबाबा अपार्टमेंटवरील टॉवरवर चढून लक्ष वेधले. यात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून आंदोलनकर्त्यांना खाली उतरवले.
लॉकडाऊच्या काळात झालेली वीज दरवाढ ही नागरिकांना अडचणीत आणणारी आहे. छोटे छोटे व्यवसाय करून जीवन जगत असताना लॉकडाऊनने कंबरडे मोडले. त्यातच आलेल्या भरमसाठ वाढीव बिलाने अनेकांच्या अडचणीत भर टाकली. त्यामुळे, हे वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या काळात रोजमजुरी नसल्याने हे बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे, केंद्र आणि राज्य सरकारला वीजबिल माफी देण्याची मागणी कृती समितीतील युवा स्वाभिमानच्यावतीने करण्यात आली आहे.
केंद्राने मदत करावी, राज्यातील विरोधी पक्षाने आग्रह धरावा...
वीजबिल कृती समितीच्या आंदोलनाला शेतकरी मिशनचे शैलेश अग्रवाल यांनी समर्थन दिले. राज्य सरकारने केंद्राकडे दहा हजार कोटी रुपये बिनव्याजी कर्ज स्वरुपात मदत मागितली आहे. केंद्राने मदत केल्यास वीजबिल माफीची शक्यता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी बोलून दाखविली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला मदत करावी. सोबतच महाराष्ट्रातील विरोधी पक्षानेसुद्धा यासाठी आग्रही भूमिका घेण्याची मागणी शेतकरी मिशनचे शैलेश अग्रवाल यांनी केली. कोरोनाचे संकट असतांनाच आर्थिक संकट उभे झाले आहे. हाताला काम नाही, रोजगार मिळत नाही, काम करायचे तर कसे असे अनेक प्रश्न असतांना बिल भरायचे कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून विनंती करूनही वीजबिल माफीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वीजबिलाची होळी झाली आता टॉवरवर चढलो, वेळीच निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांनी दिला आहे. यावेळी युवा स्वाभिमानच्या महिला शहराध्यक्ष प्रमिला हत्तीमारे, बेबी दिहाडे, लक्ष्मी वालदे, अतुल बुरे, दादाराव जिरापुरे, सुरेश वानखेडे, वासुदेव सपकाळ, शन्कर हत्तीमारे, सैदाबी, महेन्द्र मात्रे, सचिन दहाट आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.