वर्धा -युवा परिवर्तन आवाज संघटनेतर्फे कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षकांना बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वी दोनदा निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नाही. यात बुधवारी कृषी अधीक्षक कार्यालयातील उपास्थित कर्मचारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बोलण्यातून वाद झाल्याने वातावरण तापले होते. यात खुर्च्यांची फेकाफेक करत कार्यलयाला कुलूप ठोकण्यात आले.
यंदा शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यात केवळ एकाच बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. काही ठिकाणी लागवड करण्यात आलेले सोयाबीन उगवले नाही. तर, काही ठिकाणी मोठ्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा -नियम मोडणाऱ्यांना कराड पोलिसांचा दणका; महिन्यात २८ लाखांचा दंड वसूल
या संदर्भात युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेने दोन वेळा निवेदन देण्यात आले. पण 540 प्रकरणात बियाणे दोषी आढळले असताना कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले नसल्याचे सांगत तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.