वर्धा - जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील काजळी हे गाव आज दुःखात आहे. त्याचे कारण म्हणजे गावातील 17 वर्षीय युवक वीज पडल्याने जखमी झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने एकीकडे दवाखान्यात त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तेच दुसरीकडे गावात त्याच्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी गावातील युवा मंडळी एकोप्याने प्रयत्न करत होते. पण, अखेर सर्व हरले मृत्यूच्या पुढे कोणाचेच काही चालले नाही. पण देवेंद्र बोबडेच्या निमित्याने काय घडले गावात? पाहुयात या विशेष वृत्तातून....
काजळी जेमतेम 1131 लोकवस्तीचे गाव. मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील देवेंद्र बोबडे हा 17 वर्षाचा युवक. बारावी पास होणार म्हणून बीकॉम अभ्यासक्रमाला शिकण्यासाठी पैसे गोळा करत होता. शेतात जाऊन मोलमजुरी करायचा. तो काबाड कष्ट करून कुटुंबाला हातभार लावायचा अभ्यासक्रमही पूर्ण करायचा म्हणून शेतात जाऊन दोन पैसे मिळण्यासाठी धडपड करत होता.
2 ऑगस्टला गजानन डोंगरे यांच्या शेतात खत टाकायला कामावर गेला. सायंकाळी साधारण साडे 5 वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. बचावासाठी गजानन डोंगरे, त्यांची पत्नी सुनंदा आणि देवेंद्र बोबडे हा 17 वर्षीय युवक हे तिघेही झाडाखाली थांबले. तेवढ्यात त्यांच्या अंगावर वीज पडली. यात देवेंद्र जागच्या जागी निपचित पडला. यात गजानन डोंगरे आणि त्यांची पत्नी जखमी झाली. माहिती मिळताच त्यांना सुरुवातीला कारंजा आणि नंतर नागपुरात नेण्यात आले. सुनंदा डोंगरे यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. तर गजानन यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण, देवेंद्रवर चाललेले उपचार 7 जुलैला अखेर थांबले.
बहिणीचा साखरपुडा नुकताच पार पडला....