वर्धा- लॉकडाऊनमुळे संत कवरराम धर्मशाळेत अडकलेल्या कामगारांना हौशी योग असोसिएशनच्यावतीने योगाचे धडे दिले जात आहेत. या कोरोनाचा काळात रोग प्रतिकारशक्ती वाढावी, मन प्रसन्न राहावे म्हणून हा प्रयोग नक्कीच वेगळा ठरत आहे. यामुळे येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचे आरोग्य चांगले राहात आहे.
Lockdown: निवारागृहात मजुरांना दिले जातात योगाचे धडे; वर्ध्यातील उपक्रम लॉकडाऊनमुळे कामगार विविध ठिकाणी अडकले आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी घरची वाट धरत पायी प्रवास सुरू केला. पण प्रशासनाने बहुतांश कामगारांना थांबवत त्यांच्या राहण्याचा जेवणाची सोय केली. यात संत कवरराम धर्मशाळेने सुद्धा पुढाकार घेतला. महिलांना राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यांना उत्तम सोय उपलब्ध करून दिली असून उत्तम आरोग्यासाठी योग अभ्यास प्रशिक्षण दिले जात आहे.
एकाच ठिकाणी अडकून राहताना मजुरांना घराची ओढ लागली आहे. अशातच तंदुरुस्त रहावे, मन प्रसन्न ठेवावे या अनुषंगाने त्याना सकाळच्या वेळी मोकळ्या हवेत योगाचे धडे दिले जात आहे. या योग अभ्यासाने त्यांना स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत होत आहे. योग अभ्यास करतांना लॉकडाऊनमुळे घरापासून दूर असलेला ताण तणाव दूर ठेवण्यासाचा प्रयत्न हौशी योग असोसिएशनच्यावतीने केला जात आहे.
सकाळी सहा ते सात या एका तासाच्या वेळात योगाभ्यास केला जातो. यामध्ये महिला मुले सुद्धा योग अभ्यासाकरता स्वतःहून लवकर तयार होतात. बहुतेक जणांचा या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे योग प्रशिक्षक रेश्मा रघाटाटे यांनी सांगितले. प्रशासन निवारागृहात असलेल्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याकरिता विविध स्वयंसेवी संस्थाही मदत करत आहेत.