वर्धा- आई होणे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. परंतु, विविध अडचणींमुळे अनेक महिलांना मातृत्त्वापासून वंचित रहावे लागते. मात्र,विज्ञानाने या समस्येवर मात केली आहे. पन्नाशी पार केल्यांनातर एका जोडप्याच्या आयुष्यात मुलीच्या जन्माने आनंद बहरला आहे. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने दाम्पत्याला मुलगी झाली आहे.
नर्मदा श्रीराम वाकोडे या ५२ वर्षाच्या शेतकरी कुटुंबातील आहे. त्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या चांगलवाडीच्या रहवासी आहेत. ३० वर्षांपूर्वी श्रीराम आणि नर्मदा यांचे लग्न झाले आहे. मागील ३० वर्षांपासून ते मूल होण्याची उपचार घेत होते. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली. वय वाढत असल्याने नर्मदा गुडघे यांना गुडगेदुखीचा त्रास सुरू झाला. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयत त्या गुडघेदुखीच्या उपचारासाठी आल्या होत्या. मात्र, इथे त्याचा आयुष्याला कलाटणी मिळाली.
रुग्णालयाच्या टेस्ट ट्यूब बेबी विभागाच्या प्रमुख दीप्ती श्रीवास्तव यांनी त्याची पाहणी करत त्यांचे रिपोर्ट तपासले. त्या आई होऊ शकतात अशी माहिती डॉक्टरांनी त्यांना दिली. नर्मदा यांची पहिल्याच प्रयत्नामध्ये गर्भधारणा झाली. वयाच्या ५२ व्या वर्षी आई होण्याच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. याच रुग्णालयात ९ महीने राहून त्यांनी उपचार घेतले. या दाम्पत्याला मुलगी झाली आहे. खुप प्रतीक्षेनंतर अपत्य झाल्याने त्यांनी मुलीचे नाव प्रतीक्षा ठेवले आहे. ३० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाल्याने हे नाव दिल्याचे डॉ. दीप्ती सांगतात. आता आई आणि बाळ स्वस्थ आहेत. मागील ९ महिन्यांत डॉक्टर आणि स्टाफ त्यांचे कुटुंब झाल्याचे नर्मदा सांगतात.