वर्धा -आर्वी आणि देवळी तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीज पडून गोठा जळला, झाडे कोलमडली. केळीची बाग जमीनदोस्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्र विद्यालय परिसरात असलेल्या इमारतीवर छत पडले. वादळीवाऱ्यामुळे आंबा, पेरू, जांभूळ तसेच रोपवाटिका आणि प्रात्यक्षिक प्रकल्पांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. धान्य साठवणुकीच्या शेडचेही यावेळी मोठे नुकसान झाले.
आर्वी तालुक्याच्या धानोडी येथील हनुमंत कावळे या शेतकऱ्याने ४ एकरात केळीची लागवड केली होती. मंगळवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्याने केळीचे घड जमिनीवर पडले आणि त्यांची बाग जमीनदोस्त झाली. केळी बाजारात विक्रीसाठी तयार असताना अचानक आलेल्या या वादळाने तोंडांपाशी आलेला घास पळवला. या सुलतानी संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तसेच सेलू तालुक्यातील सुकली येथेही केळीचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्याच्या तळेगाव आणि जळगाव या भागात जवळपास १० ते १२ घरांचे नुकसान झाले आहे.
देवळी शहरात काही घरांची पडझड असून चिकणी येथीलही २५ घरांची पडझड झाली आहे. तसेच पडेगाव येथे वीज पडल्याने जनावरांची वैरण पूर्णपणे जळून खाक झाले. ज्ञानेश्वर कोहाड यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात ही आग लागली. सुदैवाने गोठ्यातील जनावरे बाहेर बांधली असल्याने जनावरे बचावली. आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. यामुळे नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.