महाराष्ट्र

maharashtra

वर्ध्यात रान डुकराचा तीन शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

By

Published : May 4, 2019, 11:48 PM IST

रानडुकराने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना वर्ध्यात तिन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २ जण जखमी आहेत.

मृत शेतकरी

वर्धा - जिल्ह्यात रानडुक्कर पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहेत. आज देवळी तालुक्यातील दापोरी येथील एका शेतकऱ्याचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, हिंगणघाट आणि आष्टी तालुक्यात २ घटनांमध्ये शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

देवळी तालुक्यातील दापोरी शेत शिवारात वासुदेव ठाकरे (वय ६५ ) हे सकाळी शेतात जात होते. त्यांच्यवर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सून, असा मोठा परिवार आहे.

रानडुकराने वडनेर जवळच्या फुकटा येथे शेतमजूर शत्रुघ्न धुर्वे यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने गावातील काही कुत्र्यांनी या रानडुकरावर हल्ला केल्याने शत्रुघ्न धुर्वे बचावले. तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन रान डुकराला पिटाळून लावले. धुर्वे हे मोलमजूरी करून संसाराचा गाडा चालवतात.

आष्टी तालुक्यातील पारडी येथील किसनराव सरोद शेतात जाताना अचानक रानडुकराने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त बिघडत असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details