वर्धा- कोरोना विषाणूमुळे जगभरात थैमान घातले आहे. अनेकांचा मृत्यूसुद्धा झाला. पण हा काही पहिला व्हायरस नाही. जरी यावर लस मिळाली नसली तरी यासोबत जगणे शिकावे लागणार आहे. यामुळे लॉकडाऊन जास्त दिवस राहू शकत नसल्याने यासारख्या असंख्य विषाणूसोबत जगावे लागेल. तसेच कोरोनासोबतपण जगणे शिकावे लागले, असे मत सेवाग्राम येथील न्याय वैदक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी डॉ. इंद्रजित खांडेकर यांच्यासोबत साधलेला संवाद भारत सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निधीच्या आधारावर लांसेट वैद्यकीय मासिकात २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, आपल्या देशात २०१७ मध्ये ९६ लाख ५० हजार मृत्यू झालेत. यापैकी जवळपास २५ लाख मृत्यू (दररोज ६९००) हे (यामध्ये 4 लाख लोक हे 15 ते 44 वयोगटातील आहे) संसर्गजन्य आजाराचे आहेत. यापैकी श्वसनजन्य संक्रमणाने जवळपास 3 लाख ४२ हजार (दररोज ९३६), टीबीने जवळपास 3 लाख ७५ हजार (दररोज १०२७) मृत्यू झालेत. असे दरवर्षी कमी अधिक प्रमाणात मृत्यू होत असतात. म्हणजेच आपण दररोज ६९०० मृत्यू करणाऱ्या संसर्गजन्य आजारासोबत न घाबरता जसे जगतोय तसेच कोरोनासोबत पण नक्कीच जगू शकतो, असे डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी सांगितले.
काय आहे अँटीबॉडी टेस्ट
कुठल्याही विषाणूची लागण झालेल्या लोकांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी अँटीबॉडीज टेस्ट केली जाते. या टेस्टसाठी लागणारा खर्चसुद्धा कमी आहे. पण, या टेस्टमुळे आता पॉझिटिव्ह आहे का नाही हे कळू शकत नाही. तर यापूर्वी त्याला कोरोना किंवा अन्य विषाणूची लागण झाली होती की नाही हे मात्र कळू शकेल. यासाठी ही टेस्ट केली जात. कोरोनाच्या बाबतीतसुद्धा भारत सरकार लवकर ही टेस्ट सुरू करतील, अशी आशा असल्याचे डॉ. खांडेकर यांनी सांगितले.
न्यूयॉर्क शहरात अँटीबॉडी टेस्टनंतर काय वास्तव समोर आले.
न्यूयॉर्कमध्ये अँटीबॉडी सर्व्हे करण्यात आला. तिथल्या सरकारने सुरुवातीला 1 लाख 83 हजार लोकांना कोरोनाबाधित झाली असल्याचे आकडेवारी सांगितली. यामध्ये मृत्युदर हा 5 ते 6 टक्के होता. पण जेव्हा प्रत्यक्षात अँटीबॉडी सर्व्हेनुसार तेथे 17 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यात विशेष म्हणजे हे सगळे लोक स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर बरे पण झाले आणि कोणाला कळले पण नाही. यात मृत्युदर हा जेव्हा काढण्यात आला तेव्हा तो 0.5 टक्के निघाला. यामुळे भीतीचे वातावरण असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण कोरोनातून अनेक लोक हे बरे झाले आहेत.
न्यूयॉर्कच्या सर्व्हेक्षणनुसार 20 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली. हे मापक धरले तर मुंबई पुणे दिल्ली यासारख्या शहरात अनेक लोकांना कोरोना होऊन कदाचित ते नकळत बरे पण झाले असतील. जेव्हा भारतात अँटिबॉडी टेस्ट केल्या जातील, त्यावेळी अशाच पद्धतीचे आकडे समोर येईल हे नाकारले जाऊ शकत नाही.
'स्वाईन फ्लूमध्ये काय झाले, कोरोनासोबत काय साधर्म, सोबत सोशल मीडियाचा परिणाम'
2009 मध्ये भारतात स्वाईन फ्लूची साथ आली. यावेळीसुद्धा मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा आणि हात स्वच्छ धुवा, विलगीकरण करा अशा सूचना डब्लूएचओकडून देण्यात आल्या होत्या. अशा सूचना प्रत्येक श्वसनजन्य आजाराच्या साथीच्या वेळी डब्लूएचओ देत असते. त्यावेळी स्वाईन फ्लू हा खूप धोकादायक आजार असल्याचे सांगितले होते. पण, त्यावेळी सोशल मीडिया तेवढा सक्रिय नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात माहितीपण लोकांपर्यंत पोहचली नाही. शिवाय भीतीसुद्धा पोहचली नाही. आता मात्र फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या मिलियनच्या घरात पोहचल्याने भीतीचे प्रमाणसुद्धा अधिक वाढले.
स्वाईन फ्लूच्या साथी दरम्यान भारतात सर्व्हेक्षण झाले. सुरुवातीला असे सांगण्यात आले होते की, 48 हजार लोकांना लागण झाली. पण अँटीबॉडी सर्व्हेनंतर 30 कोटी लोकांना नकळत लागण होऊन ते ठिक पण झाले होते, असे निदर्शनास आले. तसेच सुरुवातीला स्वाईन फ्लूचा मृत्यू दर हा 3.४% सांगण्यात आला होता. पण अँटीबॉडी सर्व्हेनंतर कळले की मृत्यू दर 0.02% होता. कोरोना विषाणूंमुळे बाधित झाले असले तरी त्यात भारतात 39 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे योग्य प्रकारे काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येऊ शकेल. पुढील काळात रुग्ण संख्या वाढल्यास घाबरून घरात बसण्यापेक्षा या कोरोनासोबत जगणं शिकावं लागेल.