वर्धा- भाजपच्यावतीने करण्यात आलेली पक्षांतराची भरती ही मेगाभरती नसून छोटी भरती आहे. ज्यांना जनाधार आहे, त्यांनाच पक्षात घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवाय विरोधकांनी ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा जनतेमध्ये जावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.
वर्ध्यातील पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री वर्ध्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी उपस्थित होते.
आज जे आम्हाला जनतेचे समर्थन मिळत ते आमच्या ५ वर्षांच्या कामाची पावती आहे. अजून खूप काम उरले आहे. त्यामुळे समस्या संपल्या, असा आमचा दावा नाही. पुढील ५ वर्षात दुष्काळ मुक्तीसाठी खर्ची घालणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तेलंगणाला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात आणणार -
तेलंगणाला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यासाठी ४८० किमीचे कॅनॉल तयार करणार असून त्यामाध्यमातून १०० टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काम केले जाणार आहे. यामुळे पूर्व विदर्भाचे ४ जिल्हे आणि पश्चिम विदर्भाच्या ४ अशा ८ जिल्ह्यांना मोठा फायदा होईल. मराठवाड्याबद्दल निर्णय घेण्यात आला असून १६७ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यात येणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्राच्या अवर्षण भागातील काम सुरू करायचे आहे. त्यासाठी ८९ प्रकल्पांसाठी २० हजार कोटीचा निधी पंतप्रधान मोदींनी उपलब्ध करून दिला असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
ईव्हीएमला दोष देण्याऐवजी स्वतः आत्मचिंतन करावे -
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही तोंडसुख घेतले. काही पक्षाची अवस्था अशी आहे की, त्यात कोणी राहायला तयार नाही. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी त्यांनी आत्मचिंतन केले तर बरं होईल. विरोधक हे सत्य स्वीकारण्याऐवजी असत्याची कास धरतात. या ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांनी १० वर्षे राज्य केले आणि आता त्यालाच विरोध होत आहे. ईव्हीएमवर शंका घेणे म्हणजे जनतेवर शंका घेणे आहे. विरोधकांनी जनतेत जाऊन काम केले नसल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
वाटाघाटी सुरू असून युती होईल -
विदर्भात बऱ्याच जागा आहेत. कोकणात २ जिल्ह्यात एक-दोन जागा सोडल्या तर शिवसेनेकडे इतर जागा आहेत. काही ठिकाणी आमचे नुकसान होईल तर काही ठिकाणी त्यांचे नुकसान होईल. शेवटी एकत्र येऊन लढायचे ठरवले तर २ गोष्टी धराव्या लागतात आणि २ गोष्टी सोडव्या लागतात, असे ते यावेळी म्हणाले. तसेच वाटाघाटी सुरू असून युती होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.