चाळीसगाव (जळगाव) - गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात जलद गतीने वाढ होत आहे. सद्यस्थितीत गिरणा धरणात ८५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात होत असलेली पाण्याची आवक बघता गिरणा धरणातून कधीही नदीपात्रात पाणी सोडले जावू शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग दुसऱ्या वर्षी गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू असल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.
जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या गिरणा धरणातील पाणीसाठा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ८५ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्याशिवाय ओव्हर फ्लो झालेल्या ठेंगोडा, केळझर, चणकापुर, पुनद व हरणबारी धरणातून गिरणा धरणात पाणी येत आहे. म्हणून गिरणा धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक गिरणा धरण आहे. एक लाख ४१ हजार ३६४ एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची क्षमता या धरणाची आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा माेठ्या अपेक्षेने लागून असतात.