वर्धा- जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला असून पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ येनगाव येथील नागरिकांवर आली आहे. गावात ग्रामपंचयात निवडणूक लागली तेव्हा ग्रामस्थांना पाणी मिळाले. तेव्हा मतांचा जोगवा मागणाऱ्या दोन्ही गटांनी पाणी वाटले. निवडणून येणाऱ्या गटाने विजयाचा उपकार म्हणून की काय महिनाभर पाणी दिले. नंतर ग्रामपंचायतचे पैसे संपल्याचे कारण देत पाणी वाटप बंद करण्यात आले.
यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने जिल्ह्यातील गावांची तहान भगवणारी धरणे कोरडी ठाक पडली आहेत तर, विहिरींनी तळ गाठला आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील ३० ते ४० गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येनगाव येथील नागरिकांना लगतच्या पिंपरी गावतील टँकर धारकांकडून ४० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे. हीच अवस्था जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात नजरेस पडत आहे.
येनगाव येथील नागरिकांना लगतच्या पिंपरी गावतील टँकर धारकांकडून ४० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे. येनगावची लोकसंख्या केवळ १२०० इतकी आहे. मात्र, येथील लोकांना पाणी देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरावे लागते. तसेच विहिरीत बराच वेळ बसून चार ते सहा हंडा पाणी भरावे लागते. गावातील अनेक वर्षांपासूनची कुपणलीका देखील आटली आहे. दोन तास थांबून कुठे दोन हंडा पाणी हापसले जात आहे.
तालुक्यातील पाणी टंचाई विषयी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी सांगितले की, ३० गावात पाणी टंचाई आहे. खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. लवकरच उपाययोजना म्हणून काही गावात टँकर दिले जातील. मात्र, जून महिना आला तरी शासकीय यंत्रणेकडून गावात पाण्याचा टँकर पोहचला नाही.
टँकरमुक्त महाराष्ट्र दाखवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून खटाटोप केला जात आहे. मात्र, तितका खटाटोप पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पण ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आत्ताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष करू नये म्हणजे झाले.