वर्धा - बचत गटाच्या महिलांना कर्ज वाटप सर्वात सुरक्षित आहे. आत्ता पर्यंत या महिलांनी एकही कर्ज बुडवलेले नाही. बँकांनीही कर्ज वाटप करताना त्रुटी काढून अडवण्यापेक्षा विश्वासाने कर्ज द्यावे. कारण कर्ज घेऊन ते परत न करणे हे आमच्या भगिनींच्या संस्कारात नाही, असे मत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केले. ते वर्ध्याच्या वऱ्हाड महोत्सव 2020 च्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले आहे. बचत गटाच्या महिलांनी तयात केलेल्या वस्तू या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. यात वर्धा जिल्ह्यातील 55 आणि इतर सहा जिल्ह्यातून 126 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. विविध 30 खाद्य पदार्थांची मेजवानीही वर्धेकरांना येथे अनुभवता येणार आहे. 8 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान शहरातील आरटीओ मैदानात हा महोत्सव सुरू राहील. यावेळी बँकेच्या वतीने 112 बचत गटांना अर्थसाह्य स्वरूपात 112 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.