वर्ध्यात दोन कोरोनाबाधितांची नोंद, रुग्णसंख्या १८वर
वर्ध्यात आणखी दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांची संख्या १८ झाली आहे.
वर्धा- शहरात आज दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक महिला अकोल्यावरून परतली आहे. तर दुसरी 19 वर्षीय मुलगी ही कोरोनाबाधित परिचारिकेची नातेवाईक असून तिच्या संपर्कात आली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा आता 18 वर जाऊन पोहोचला आहे.
सावंगी येथील कोरोनाबाधित परिचरिका मुंबईतून परत आल्यानंतर ती घरात राहिली. शिवाय कुटुंबीयांनी गृहविलगीकरणात असतांना नियम तोडले. यात तिच्या घरातील चौघांचे नमुने घेण्यात आले होते. यात तिचा पतीसह अन्य दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. यात परिचरिकेच्या पतीची 19 वर्षीय बहिणीला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर सावंगी मेघे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
24 मे रोजी अकोला येथून महिला 1 महिन्याच्या बाळाला घेऊन आर्वी येथे आली. तिला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. तिचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज प्राप्त तपासणी अहवालात ती कोरोना विषाणूने बाधित असल्याचे पुढे आले.
या महिलेच्या एक महिन्याच्या बाळालाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाकडून खबरदारी आणि काळजी घेत त्यांना सेवाग्राम रुगणालयात हलवण्यात आले आहे. पुढे बाळाला जवळ ठेवायचे, की नाही यावर तज्ञ डॉक्टर निर्णय घेतील. यासह बाळाचीदेखील तपासणी करण्यात येणार असल्याचे आर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीत झोपाटे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
यासह सिकंदराबाद येथे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या निकटवर्तीय 17 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना आयसोलेशनमधून त्याच्या राहत्या घरात गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.