महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णवाहिकेतून नागपूर ते वर्धा प्रवास करणे महिलेला पडले महागात; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

वर्धा शहरातील एक रुग्णवाहिका रुग्ण घेऊन नागपूरला गेली होती. नागपूरातून वर्धा येथे परत येताना त्यातून एक महिला शहरात आल्याची माहिती समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

wardha police station
वर्धा पोलीस ठाणे

By

Published : Apr 25, 2020, 8:14 AM IST

वर्धा- नागपूरच्या सतरंजीपुरा येथुन रुग्णवाहिकेतून आलेल्या एका महिलेविरुद्ध साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परवानगी न घेता सदर महिला वर्ध्यातील तिच्या नातेवाईकांकडे आली. चोरट्या पद्धतीने रुग्णवाहिकेतून आलेल्या महिलेसह नातेवाईकांवर तसेच रुग्णवाहिका चालक मालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्धा शहरातील एक रुग्णवाहिका रुग्ण घेऊन नागपूरला गेली होती. नागपूरातून वर्धा येथे परत येताना त्यातून एक महिला शहरात आल्याची माहिती समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी बोरकर यांना शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता मिळाली. सदर घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना तात्काळ देण्यात आली. उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक योगेश पारधी, नायब तहसीलदार जाधवर यांनी चौकशी केली. यामध्ये ही महिला महादेवपुऱ्यातील एका नातेवाईकांकडे आली असल्याचे समजले.

ही महिला नागपूरच्या सतरंजीपुरा येथून आल्याचे बोलले जात आहे. ती महिला योग्य माहिती देत नसल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. पोलिसांनी महिला, तिचे नातेवाईक, रुग्णवाहिका मालक व चालकांविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. साथरोग प्रतिबंध कायद्याच्या कलम 3, भादंविच्या कलम 269, 270, 278 आणि 279 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या नातेवाईकांना आयटीआय टेकडीवरील तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरला ठेवण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चिंन्नोरं करीत आहेत. यापुढे कोरोनाबाधित जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने वर्धेत प्रवेश केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिला आहे.

या महिलेचे नमुने घेऊन चाचणी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई होईल. शिवाय बाहेरून येणाऱ्यांची कडक तपासणी करून योग्य खबरदारी घेतली न गेल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details