वर्धा - शहरातील सेवाग्राम रेल्वे स्टेशनच्या परिसरातून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे चोरीचे दागिने आढळून आले. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून मंदिरातील मूर्तींच्या अंगावरील दागिने आणि चांदीचे डोळे हस्तगत केले आहेत. देवा जगन्नाथ टाक असे आरोपीचे नाव आहे. तो आदिलाबादचा रहिवासी आहे. तेलंगणा पोलीस देखील त्याचा शोध घेत होते.
तेलंगणा, महाराष्ट्रात मंदिरातील दागिन्यांवर डल्ला मारणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात - सेवाग्राम रेल्वे स्टेशन
सेवाग्राम रेल्वे स्टेशनच्या परिसरातून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशी दरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या बॅगेतून मंदिरातील मूर्तींच्या अंगावरील दागिने आणि चांदीचे डोळे मिळाले आहेत
शहरातील महिलाश्रम हनुमान मंदिरातील मूर्तीच्या अंगावरील चांदीचे डोळे आणि इतर साहित्य काही दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. शोधा शोध घेऊनही चोराचा पत्ता लागत नव्हता. त्यांनतर शहरातील शास्त्री चौकसह इतर ठिकाणच्या मंदिरात अशाच प्रकारे चोरीच्या घटना घडल्या होत्या. आरोपीची पोलिसी पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली आहे. तेलंगणा राज्यात देखील अनेक मंदिरात आरोपीने चोरी केल्याचे कबुल केले. गेल्या काही दिवसांपासून आरोपी महाराष्ट्रात फिरत होता. त्याने अनेक चेन स्नॅचिंग देखील केल्या आहेत.
आरोपी देवा टाक हा मूळचा अदिलाबाद येथील आहे. मंदिरातील मूर्तींचे डोळे, चांदीचे मुकुट व इतर साहित्य चोराने लंपास केले होते. तेलंगणामध्ये अनेक चोऱ्या केल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र तो तेथील पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर वर्धा पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही. पोलिसांनी त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्यासह एएसआय विवेक लोणकर, रितेश गुजर, पवन निलेकर, सचिन दीक्षित, अरविंद घुगे यांनी केली आहे.