वर्धा -दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याच्या पवनार भागात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अतिवृष्टीच्या नियमानुसार हा पाऊस 65 मिलिमीटर पेक्षा कमी असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पवनार येथील शेतकरी सुनील निंबाळकर यांच्या पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे 12 एकर केळीची बाग मोडली आहे. पपईच्या बागेला देखील पावसाचा फटका बसला आहे. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे. आज पालकमंत्री सुनील केदार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहाणी करून, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार देखील उपस्थित होत्या.