वर्धा - अशोक चव्हाण यांनी अर्थसंकल्प वाचला पाहिजे. कदाचित, ते दोन्ही सभागृहांचे सदस्य नसल्याने त्यांना अर्थसंकल्प वाचण्याची संधी मिळाली नसेल. त्यांना अर्थसंकल्पाची एक प्रत नक्की भेट पाठवणार अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अशोक चव्हाणांनी सरकारने लोकसभेच्या निवडणुका संपताच शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या टीकेबाबत विचारले असता मुनगंटीवारांनी ही खोचक टीका केली.
ते वर्ध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी वर्ध्यात आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला दिलेल्या भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, शिवसेना असो की भारतीय जनता पार्टी ही सत्तेचं नसून सेवेचं राजकारण करते. मुख्यमंत्री कोण व्हावा, सीएम कोण व्हावा, यापेक्षा कॉमन मॅनसाठी आपण काय करु शकतो हे जास्त महत्त्वाचे आहे. हीच भावना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॉमन मॅनसाठी, त्यांच्या विकासासाठी सातत्याने झटत आहेत. सर्वांचं कल्याण व्हावे, या दृष्टीनं सरकार काम करते आहे. शेवटच्या पंक्तीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच कल्याण व्हावे हे राजकारणाचे ध्येय असलं पाहिजे असं मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.