वर्धा : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचार संहिता घोषित झाली आहे. याचे उल्लंघन होवू नये याकरीता निवडणूक आयोगाने भरारी पथकांचे गठण केले आहे. मंगळवारी (दि.१७) रोजी येथील स्व. वसंतराव नाईक चौकात भरारी पथकांची वाहन तपासणी सुरू होती. याच दरम्यान कापूस व्यापारी पंकज अग्रवाल हे गाडीने घेवून तळेगाव मार्गाने जात होते. पथकातील संजय दुबे यांना संशय आल्याने त्यांच्या गाडीची संपूर्ण झडती घेतली. त्यांना एका बॅगेत ६५ लाख रुपयाची रोख रक्कम आढळली. ही बातमी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसू व्यापाऱ्यांपर्यंत लागलीच पोहचली. परिणामी कापसाने भरलेली वाहने घेवून काही शेतकरी, कापूस व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी सुध्दा तहसील कार्यालयात पोहचले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ती रक्कमकापूस व्यापाऱ्याची :तळेगाव मार्गावर जगदंबा कॉट फायबर कंपनीने असून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला होता. त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी एच.डी.एफ.सी. बँकेमधून ७० लाख रुपये काढले होते. यातील ५ लाख रुपये कार्यालयात मजुरांना देण्यासाठी पाठवले. ६५ लाख रुपये गाडीमधून तळेगाव मार्गे फॅक्ट्रीकडे घेवून जात होतो. याच दरम्यान मला ताब्यात घेतले. बँकेचे स्टेटमेंट व आवश्यक दस्ताऐवज तहसील कार्यालयात जमा केले आहे. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा स्टेटमेंट दिले आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांसह व्यापारी सुध्दा अडचणीत आले आहेत. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी माहिती कापूस व्यापारी पंकज अग्रवाल यांनी दिली आहे.
आयोगाच्या नियमानुसारच कारवाई : आचार संहिता लागू असतांना नियमानुसार १० लाखाच्यावर रोख रक्कम कुणालाही जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकाला वाहनातून ६५ लाख रुपयाची रोख रक्कम मिळाली. परिणामी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली आहे. सध्या तरी रक्कम व वाहन जप्त केले नसून ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती तहसिलदार विध्यासागर चव्हाण यांनी दिली आहे. भरारी पथकातील वरीष्ठ लिपीक संजय दुबे, पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बांबरडे, नगर परिषद कर्मचारी शंतनू भांडारकर यांच्या पथकाने तहसिलदार विध्यासागर चव्हाण, नायब तहसीलदार स्मिता माने यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.