वर्धा-तळेगाव टालाटुले येथे भाजपच्या वतीने अर्धनग्न जलसमाधी आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच, सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपच्या वतीने तळेगाव टालाटुले गावातून मोर्चा काढत तलावात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी अर्धनग्न जलसमाधी घेत विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. विदर्भातील काही भागात अतिवृष्टीसह, तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक जवळ-जवळ ९५ टक्के खराब झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशातच कपाशीच्या पिकांवर बोंड अळीचे आक्रमणही झाले. त्यानंतर जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये विदर्भाला सापत्न वागणूक देण्याचे काम माहाविकास आघाडी सरकारने केले आहे.