महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात पक्षी सप्ताह बहरला; पक्षिनिरीक्षणात बालगोपालांचाही सहभाग - पक्षी सप्ताह

बहार नेचर फाउंडेशनद्वारे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला आहे.

पक्षी सप्ताह

By

Published : Nov 14, 2019, 6:22 AM IST

वर्धा -बहार नेचर फाउंडेशनद्वारे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला आहे. निसर्ग आणि पक्षी याचे महत्त्व या सप्ताहात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिनी वर्ध्याच्या ऑक्सिजन पार्कमधून सप्ताहाची सुरवात करण्यात आली. तर जेष्ठ पक्षीतज्ज्ञ यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम येथील आनंदनिकेतन येथे समारोप करण्यात आला.

पक्षी सप्ताह बहरला, पक्षिनिरीक्षणात बालगोपालांचाही सहभाग


सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात चितमपल्ली यांच्या उपस्थितीत भारतीय नीलपंख या वर्धा 'शहरपक्ष्याच्या' फलकाचे अनावरण करण्यात आले. लोकांच्या पसंतीतून मतदान घेऊन निलपंख या शहर पक्षाची निवड करण्याचे काम बहार नेचर फाऊंडेशनने केले. विविध उपक्रम राबवत पक्षी आणि नागरिकांना जोडण्याचा पर्यंत सतत केला जात आहे. यासह चारोळीवृक्षाचे रोपण तसेच पक्ष्यांवरील घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.


पक्षी सप्ताहाचा समारोप सेवाग्राम आश्रम परिसरातील तलाव व शेतशिवारात पक्षिनिरीक्षणाने करण्यात आला. या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षीनिरीक्षण व पर्यावरण संरक्षण उपक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.


महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राबविलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदीही करण्यात आल्या. यावेळी, पक्षीअभ्यासक राहुल वकारे यांनी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांची ओळख पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे करून दिली. तर दीपक गुढेकर यांनी या सप्ताहात केलेल्या सुमारे ३५ प्रकारचे पाणपक्षी व अन्य पक्ष्यांच्या निरीक्षणातील नोंदींची सचित्र माहिती दिली. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. सालिम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच पक्षिनिरीक्षणातील आपले अनुभवकथनही पक्षीमित्रांनी केले.


आठवडाभर चाललेल्या उपक्रमात दररोज सकाळी पर्यावरणप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षण व परिसर अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. वनौषधी उद्यानात विविध प्रकारच्या वृक्षवल्लींची ओळख पक्षिमित्रांनी करून घेतली. तर वागधरा येथे पक्षीसंवर्धनाबाबत गावकऱ्यांशी संवादही साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details