वर्धा - जिल्ह्याला पुन्हा एकदा ’अवकाळी’ पावसासह गारपीटाचा तडाखा बसला आहे. शेकडो एकरातील पीके जमिनदोस्त झाले आहे तर, घरे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणान नुकसान झाले असून गारपिटीने पक्ष्यांचाही मृत्यू झाला आहे.
वर्ध्याला पुन्हा ’अवकाळी’ पावसाचा तडाखा तर, गारपिटीने पक्ष्यांचा मृत्यू शुक्रवारी रात्रीच्या सुमारास समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील काही गावांना अवकाळी पाऊस, वादळ आणि गारांनी झोडपले. त्यामुळे शेतरकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे. शेकडो एकरातील गहू, चणा, तूर, ज्वारी,जवस इत्यादी पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांचे, गोठ्यांचेही नुकसान झाले. तर, जोरदार गारांच्या तडाख्याने काही पक्ष्यांचाही मृत्यू झाला आहे. शेकडो बगळे, कावळे, चिमण्या आदी पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला.
समुद्रपूर तालुक्यातील काही भागाला मध्यरात्री सुमारास गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. यावेळी सुमारे २० ते ३० गावांना याचा फटका बसला आहे. शेतात कापणीला आलेल्या चणा, गहू, ज्वारी, जवस, कापूस इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास, २० मिनीट लिंबाच्या आकाराच्या गारांची बरसात झाली. यामुळे फळपिकांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका गिरड, शिवणफळ, जोगीणगुंफा, उंदिरगाव, धोंडगाव, येदलाबाद, भवानपूर, पिंपळगाव, झुणका, रुनका, आर्वी, मोहगाव,लसनपूर, खैरगाव, पाईकमारी, परंडा, आरंभा, बोडखा, बर्फा या गावांना बसला आहे.
तर, हिंगणघाट तालुक्यात 100 हेक्टरच्यावर पिकांचे नुकसान झाले. यात तालुक्यातील शेगाव (ल), उमरी, सावली (वाघ), सेलू, सुलतानपूर या गावांचा समावेश आहे. या अवकाळी पावसाने जवळपास 1700 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे आणि मदत घ्यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच, यामुळे शाळांचेही नुकसान झाले असून ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर विजेचे खांब तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.