वर्धा -आर्वी तालुक्यात एका सात वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करत तापलेल्या टाईल्सवर बसवले होते. या प्रकारात मुलाला गंभीर इजा झाली. याच घटनेच्या निषेधार्थ मातंगसमाजाने वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेही सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना ढोबळे म्हणाले, लहान मुलासोबत झालेल्या प्रकाराने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याच समाजाच्या लेकरावर का अन्याय होतो? सोबतच संधी भेटल्यावर याचा बदला घेतला जाईल. त्यासाठी समाजातील तरुण फकिरानी संकल्प केला पाहिजे, असेही ढोबळेंनी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवले.
मातंग समाजाने काढलेल्या मोर्चाविषयी बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे
या प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढत योग्य तपास न झाल्यास न्यायालयात दाद मागू असे ढोबळे म्हणाले. प्रकरणातील आरोपी अमोल ढोरेसह आणखी काही लोक सहभागी आहेत. तसेच आरोपी हा दारूचा व्यवसाय करतो. त्याचे हितसंबंध असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री यांना सांगून न्याय देण्याची मागणी केली आहे, असेही ढोबळे म्हणाले.
या मोर्चाची सुरुवात शिवाजी चौकातून करण्यात आली. शहरातील प्रमुख बडे चौक, बजाज चौक, सिव्हिल हॉस्पिटल होत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचला. यावेळी सात वर्षाच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला पुरुष पुरुष उपस्थित होते. या मोर्च्यात जिल्हाध्यक्ष अजग डोंगरे, भीमराव डोंगरे, दिलीप पोटफोडे, अजय डोंगरे, हिराताई खडसे, आदी सहभागी झाले होते.