वर्धा - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भेटण्याच्या कारणावरून शिवसेनेच्या दोन गटात वादाची घटना काल घडली. दरम्यान एकमेकांच्या अंगावर धावून जाण्य़ासह शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओसोबत शिवसेनेची अंतर्गत गटबाजीही बाहेर आली आहे. शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत वर्धा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसैनिक सीताराम भुते यांनी माजी खासदार अनंत गुडे यांच्या कानशिलात लगावल्याचा दावा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाचे संकट असल्याने कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याचे सांगत आहेत. मात्र, एकीकडे शिवसैनिक कोरोना नियमांना धाब्यावर बसवून गर्दी करत आहेत.
वर्धा येथे मास्क न लावल्याचा कारणावरून शिवसैनिकांमध्ये भांडण झाले, त्यामध्ये शिवसैनिक सिताराम भूते यांनी माजी खासदार अनंत गुडे यांच्या कानशिलात लगावली, त्याबाबत बोलताना भुते आणि जिल्हाप्रमुख बाळा शहागाडकर 'मास्क न लावल्याने मास्क लावण्यास सांगितल्याने झाला वाद'
उदय सामंत दौऱ्यावर आलेले असताना त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सामाजिक अंतरचा नियम गर्दीत पायदळी तुडवल्याचे दिसून आले. दरम्यान, या गर्दितच शिवसैनिकांत राडा झाला. विश्रामगृहावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सिताराम भूते मंत्री सामंत यांना निवेदन देण्यास आले. तेव्हा, त्यांनी मास्क न लावल्याने मास्क लावण्यासाठी सांगितल्यानंतर वादाला सुरूवात झाल्याचे जिल्हाप्रमुख बाळा शहागाडकर सांगतात. तर, बोलताना चुकीचे शब्द वापरल्याने गुडे यांच्या कानशिलात लगावल्याचे भुते सांगत आहेत.
'वरच्या सुरात बोलल्याने कानशिलात लगावली'
हा बदनाम करण्याचा प्रकार आहे. यामध्ये संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट असल्याचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर म्हणाले आहेत. तर, सीताराम भुते म्हणतात काही तीन चार पदाधिकऱ्यांना घेऊन पक्षाचे मंत्री यांना भेटण्यासाठी जात असतांना माजी खासदार तथा संपर्क प्रमुख अनंत गुडे यांनी आपल्याला वरच्या सुरात बोलल्याने त्यांना दोन कानशिलात हाणल्याचा दावा भुते यांनी केला. मी शिवसैनिक आहे, माझा मतदार संघाचा प्रश्न मांडताना तुम्ही कोण अडवणारे, असाही प्रश्नही भुते यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.