वर्धा- वर्ध्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस येण्यापूर्वी विजेने रौद्ररूप धारण करत आकाशात चांगलेच तांडव नृत्य केले. यावेळी शेतातील दोघांनी विजेच्या रुपात आलेल्या मृत्यूला जवळून पाहिले. दैव बलवत्तर म्हणूनच दोघेही थोडक्यात बचावले. ज्ञानेश्वर जगनाडे, राजेश अंबाडरे अशी या दोघांची नावे आहे.
झाडावर वीज पडूनही थोडक्यात बचावले दोन शेतकरी; वर्ध्याच्या वायफड येथील घटना - death
शेतात काम करत असताना दोघेही शेतकरी झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेले. त्यावेळी झाडावर वीज कोसळली. मात्र दोघेही थोडक्यात बचावले.
वायफड डोरली येथील रहवासी ज्ञानेशवर जगनाडे यांच्या शेतात रविवारी कपाशीची अंतर मशागत होती. त्यामुळे ते राजेश अंबाडरेला सोबत घेऊन शेतात काम केले. डवरण झाल्यानंतर दोघेही घराकडे परत जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी आकाशात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाचे थेंब अंगावर पडू लागल्याने दोघेही कपडे आणि डब्बा लटकून ठेवलेल्या झाडाकडे गेले. एवढ्यातच कानठळ्या बसवणारा जोरदार आवाज झाला. त्यानंतर ज्या शर्टला अंगात घालणार त्याच शर्टमधील मोबाईलने पेट घेतलेला होता. विजेच्या रुपात आलेल्या मृत्यूला ज्ञानेश्वर आणि राजेश दोघांनी जवळून पाहिले. पण काळ आला असला तरी वेळी आली नव्हती ही म्हण खरी ठरली दोघेही बचावले.
मृत्यू हा एक क्षणाच्या अंतरावर पाहून दोघेही घाबरून गेले. या धक्क्यातून सावरत दोघेही घराकडे परत आले. वीजा पडत असल्यावर झाडापासून दूर राहावे, असे सांगितले जाते. पण अंग आणि कपडे भिजू नये म्हणून आपण झाडांचा आसरा घेतो हे किती धोक्याचे ठरू शकते, हे या उदाहरणावरून नक्कीच बोध घेण्यासारखेच आहे.