वर्धा - देवळी-सेलसुरा दरम्यान झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. सेलसुरा जवळील कृषी विज्ञान केंद्राजवळ शनिवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. रानडुकरांचा कळप आडवा आल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
रानडुकरांचा कळप आडवा आल्याने तीन वाहनांचा अपघात; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी - अपघात
वर्ध्यातील सेलसुरा परिसरात रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. रानडुकरांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन कार पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच परिसरात जानेवारीमध्ये भावी डॉक्टर्सच्या कारला अपघात झाला होता, त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.
रानडुकरांचा कळप रस्त्यावर आडवा आला, त्यांना धडकून एक कार पलटी झाली. तेवढ्यात मागून येणारी दुसरी कार रानडुकरांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका दुचाकीला धडकली आणि कार पलटी झाली. या तीन वाहनांच्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना सावंगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत आणि जखमींची नावे कळू शकलेली नाहीत.
जानेवारीमध्ये सेलसुरा परिसरातील कृषी विज्ञान केंद्राजवळ याच मार्गावर झालेल्या अपघातात सात भावी डॉक्टर्सचा मृत्यू झाला होता.