वर्धा -समुद्रपूर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंदी असलेली सुगंधित तंबाखू जप्त केली. ही तंबाखू नागपूरकडून चंद्रपूरला जात होती, यावेळी आरंभा टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे प्रगटीकरणं शाखेचे अरविंद येनूरकर यांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला एका ट्रकमधून नागपूर येथून चंद्रपूरकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मीळाली. आरंभ टोल नाक्याजवळ ट्रक (क्र.MH 34 BG 4116) सापळा रचून थांबवण्यात आला. यावेळी पंचासह समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकसह तब्बल 82 पोत्यांतील 20 लाख 79 हजार रुपयांची सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केली. संबंधित ट्रक नवीन आहे. ट्रकचा विचार करता पोलिसांनी तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी ट्रक चालकाकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. 82 पोत्यात महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू मसाला, निर्बंध घातलेली ईगल तंबाखू, माझा सुगंधित तंबाखू, मालिकचंद रॉयलचे पाकीटे जप्त केली. याची बाजारभाव प्रमाणे पाकीटावरील छापील किंमत जरी 20 लाख असली तरी बाजरभाव किंमत 40 लाखाच्या घरात आहे. नजमुद्दीन खान (रा.पडोली जिल्हा चंद्रपूर) असे ट्रकचालकाचे नाव आहे. समुद्रपूर पोलीस ठाण्यात कलम 188, 273, 274, 328 भारतीय दंड विधानअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.