वर्धा- वनक्षेत्र जास्त असणाऱ्या देशांमध्ये हॅपिनेस इंडेक्स अर्थात आनंदी असण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे आपल्या जर आनंदी जीवन जगायचे असेल वृक्षालागवडीत सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी येथे केले. ते 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जंगलापूर येथे वनमहोत्सव उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
लोकांच्या सहभागामुळे 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. काही वर्षांपूर्वी ग्लोबल वार्मिंग हा विषय केवळ चर्चा सत्राचा होता. पण आज ग्लोबल वार्मिंगमुळे प्रत्येक वर्षी आपण नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. यावर्षीही उन्हाळा तीव्र आणि दीर्घ स्वरूपाचा होता. त्यामुळे वनक्षेत्र जास्त असेल तर पाणी सुद्धा जास्त राहील. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने 10 झाडे तरी लावावीत, असेही ते म्हणाले. फिलिपाईन्स या देशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 10 झाडे लावायला सक्तीचे आहे. त्यानंतरच त्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जाते. आपल्याकडे सक्ती करण्याची गरज पडू नये. सक्ती पेक्षा स्वतःहून केलेले कोणतेही काम चांगले आणि कायमस्वरूपी होते. आजच्या ग्लोबल वार्मिंगला थोपवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
पोलीस अधीक्षक बसवराज तेली म्हणाले की, पृथ्वीवर जगण्यासाठी पाणी आणि ऑक्सिजन या दोन बाबी आवश्यक आहेत. या दोन्ही बाबी झाडांमुळे निर्माण होतात. ही पृथ्वी पुढील पिढीसाठी जगण्यायोग्य राहावी यासाठी आतापासून आपण काळजी घेतली पाहिजे. आज भूजल पातळी 80 फुटावरून 600 फुटापर्यंत खाली गेली आहे. पुढच्या 30 वर्षात काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही. हे थांबवायचे असेल तर, प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे असेही त्यांनी सांगितले.