वर्धा -विदर्भाला उत्तम अशी जंगलसंपदा लाभली आहे. यात बोर व्याघ्र प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्याच्या पर्यटनाला चांगली चालना मिळून रोजगार मिळेल अशी आशा होती. मात्र, मागील काही दिवसात पर्यटकांची गर्दी कमी झाल्याने जिप्सी आणि गाईड यांना चांगलाच फटका बसला आहे. त्यातच अगोदर सुरू असलेल्या जिप्सीची रोटेशन पद्धत बंद पडल्याने यात आणखी भर घातली आहे. तर, स्पर्धा सुरू झाल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यात जो यशस्वी होईल त्यालाच पुढच्या काळात फायदा होणार आहे. यामुळे काहींमध्ये नाराजी तर काहींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा व्याघ्र प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांकरीता 27 जिप्सी उपलब्ध होत्या. त्या आता कमी होऊन 18 जिप्सीच राहिल्या आहेत. यात नागपूरकडून येणाऱ्या अडेगाव गेटवर ३ पैकी केवळ १ जिप्सी राहिली आहे. तर बोर गेटवर आधी 24 जिप्सी होत्या पण सध्या येथे 17 जिप्सीच उपलब्ध आहेत. यात आधी रोटेशननुसार जंगलात पर्यटकांना घेऊन जाण्याची संधी मिळायची. प्रत्येकाला फेरी दिली जायची. मात्र, काही दिवसांपासून रोटेशन पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जो पर्यटकांना आणेल त्यालाच येथे काम मिळत आहे. या पद्धतीने काही जिप्सी मालक ज्यांना रोटेशन पद्धतीने फेरी मिळायची त्यांना फटका बसला आहे. परिणामी अनेकांना महिन्याच्या गाडीची किस्त (हप्ते) निघत नसल्याने गाड्या विकाव्या लागल्यात. पण यामुळे जे जिप्सीचालक पर्यटकांना चक्क नागपूरवरून आणून त्यांना जंगल सफारी घडवत आहे, त्यांना मात्र नफा मिळत असल्याचे जाणकार सांगतात.