वर्धा - प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. वर्ध्यात जे घडलं ते ऐकून पाहून तुम्हालाही कदाचित असंच वाटेल. मध्य प्रदेशमधील मुलीची आणि महाराष्ट्रातील मुलाची टिकटॉकमधून मैत्री झाली. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं आणि पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
अजब लग्नाची गजब गोष्ट! टिकटॉकच्या ओळखीतून मैत्री... अन् पहिल्याच भेटीत प्रेम विवाह - टिकटॉकच्या ओळखीतून लग्न
मध्य प्रदेशमधील मुलीची आणि महाराष्ट्रातील मुलाची टिकटॉकमधून मैत्री झाली. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं आणि पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
आर्वीतील एका युवकाने टिक-टॉकवर व्हिडिओ बनवले. त्यांचे व्हिडिओ पाहून मध्य प्रदेशात राहणारी युवती त्याच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र, याचवेळी एक दुःखद प्रसंग युवतीवर ओढवला. कर्करोगासारख्या आजाराने तिला ग्रासलं. मात्र, या कठीण प्रसंगात युवकाने तिची साथ सोडली नाही. त्याच्या साथीने तिने कर्करोगावर मात केली आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला.
आजारातून बरे झाल्यानंतर तिने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याला भेटण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रातील वर्ध्यात पोहचली. दोघांची पहिली भेट झाली, ती आर्वीच्या बसस्थानकावर. एकमेंकाना भेटल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. यासंदर्भात मुलाने आपल्या घरच्यांना माहिती दिली. मुलाच्या घरचे तयार झाले आणि यवतमाळ जिल्ह्यात मंदिरात दोघांचा विवाह पार पडला. तथापी, या लग्नाने मुलीचे आई-वडील नाराज असून एकदिवस ते माफ करतील, या आशेने दोघांचा संसार सुरू झालाय. प्रेमाला सिमा नसतात, हे घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालयं.