वर्धा -जिल्ह्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर 15 नोव्हेंबरला एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती. ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने चालला होती. या ट्रकमधून सुकामेवा आणि मसाल्याच्या पदार्थांची वाहतूक करण्यात येत होती. सुरुवातीला हा अपघात झाल्याचे निर्दशनास आले होते. मात्र हा अपघात नसून, मालाची अफरातफर करण्यासाठी जाणीवपूर्वक ट्रक पलटी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
महामार्गावर तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास एक अपघात घडला. हा अपघात कारंजा तालुक्यातील देववाडी शिवारात घडला. या अपघातात सुकामेवा घेऊन नागपूरच्या दिशेने येणारी ट्रक पलटी झाली होती. ट्रक पलटी झाल्याची माहिती ट्रकचालक जमीर अहमद याने दिली. अपघातानंतर ट्रकचालक क्लिनर व अन्य एक जण असे तिघे घटनास्थळावरून निघून गेले. आणि त्यानंतर या ट्रकमधील सुकामेवा चोरीला गेला होता.
ट्रकमधील मालाची अफरातफर लपवण्यासाठी रचला कट
दरम्यान ट्रक अपघाताची तक्रार देण्यासाठी व्यापारी हिमांशू भद्रा हे पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा हा अपघात बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, ट्रकमधील मालाची अफरातफर झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रक चालक जमीर अहमद(36) तकसिर अहमद(28) क्लिनर महमूद जुबेर फजलानी (33) यांना अटक केली.