वर्धा :गांधीजींच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमी म्हणजे वर्ध्याचे सेवाग्राम आश्रम होय. वर्ध्याचे हेच सेवाग्राम आश्रम स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार आहे. याच भूमीतील महात्मा गांधीचे वास्तव असलेली बापू कुटीला (Bapu Kuti where Mahatma Gandhi Lived) तब्बल 84 वर्षांचा काळ लोटला. अनेक उन्हाळे पावसाळे या कुटीने पाहिले असतील. पण, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आजही त्याच पद्धतीने ऐतिहासिक ठेवा जपला जातो. यासाठी सिंदीची पाने हे या कुटीचे संरक्षण करते तरी कसे हे जाणून घेऊ या विशेष रिपोर्टमधून...
बापूकुटीच्या भिंतींना सिंदीच्या पानांचं आच्छाद :देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेवाग्रामच्या पावन भूमीत 1936 मध्ये जेव्हा जमनाला बजाज यांच्या आग्रहाने महात्मा गांधींजी वर्ध्यातील तत्कालीन पालकवाडी येथे आले. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे राहण्यास संमती दिली. स्थानिक कामगार आणि स्थानिक वस्तूंच्या साह्याने ही बापू कुटी तयार झाली. या परिसरात अशाच पद्धतीने मातीच्या साह्याने बा कुटी, बापू कुटी, आदी निवास, रसोडा, परचुरे कुटी, बापूचे कार्यालय आश्रम परिसरात आहे.
अशी आहे संरक्षण पद्धत : पण आठ दशके लोटूनही ऐतिहास बापू कुटी आहे त्याच स्थितीत आहे. दररोज शेण आणि मातीच्या साह्याने सारवून या कुटीचे जतन केले जात आहे. पण, पावसाळ्यात जर पाणी आले, तर या भिंती पाण्याने खराब होऊन केव्हाच पडल्या असत्या. पण, पावसाच्या पाण्याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी सिंदीच्या झाडाची पाने (झाडू तयार होते त्या झाडाची पानं) त्यापासून आच्छादन देण्यासाठी झांजी (एक विशिष्ट पद्धतीने बांधून भिंती झाकणारी झांजी) भिंतीना लावली जाते.