वर्धा - हिंगणघाट येथील वणा नदीच्या कवडघाट परिसरात चौघे पाण्यात बुडाले होते. सोमवारी हरतालिकेच्या गौरी विसर्जनाकरिता आले असता घटना घडली होती. मागील चार दिवसांपासून बेपत्ता मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे. आज (गुरूवारी) चौथ्या दिवशी यातील एका महिलेचा तिसरा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील तुराणा घाटाच्या काठावर काही जणांना आढळून आला. दीपाली भटे असे मृत महिलेचे नाव आहे. घटना स्थळापासून 75 किमी अंतरावर हा मृतदेह मिळाला आहे. तर अजूनही एसडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून अडचणींचा सामना करत 13 वर्षीय अंजनाचा शोध सुरू आहे.
हेही वाचा -वर्धा : उत्तम स्टील वसाहतीत महिलेची आत्महत्या, दोन चिमुकल्यांचेही आढळले मृतदेह
तर चौथा मृतदेह हा रिया भगत यांच्या 13 वर्षीय मुलीचा आहे. यात तिची आई आणि भाऊ या दोघांचे मृतदेह सापडले आहे. एसडीआरएफचे दोन पथकांच्या साह्याने ही शोध मोहीम सुरू आहे. नदीला पूर असल्याने पाणी गढूळ झाले आहे. यामुळे मृतदेह शोधण्यास अडचण निर्माण होत आहे. मात्र, शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे एसडीआरएफ नागपूरचे असिस्टंट कमांडन्ट सुरेश कराळे यांनी दिली.