वर्धा- चोवीस तास पोलिसांची वर्दळ असणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयलगतच्या घरातच चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांनी घरातील 35 हजार रुपये रोख, सोन्याची नथ आणि चांदीचे शिक्के, असा एकूण 56 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.
वर्ध्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयानजीकच्या घरातच चोरट्यांचा डल्ला सुनील उमरे यांच्या घरामध्ये या चोरट्यांनी डल्ला मारला आहे. उमरे यांचे घर पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी आहे. यामुळे या ठिकाणी दिवस-रात्र पोलिसांचा पहरा असतो. मात्र, तरीही चोरट्यांनी उमरे हे घरी नसताना रात्रीच्या वेळी हात साफ केला आहे. चोरट्यांनी दोन लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये चोरट्यांनी घरातील 35 हजार रुपये रोख, सोन्याची नथ आणि चांदीचे सिक्के, असा एकूण 56 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
उमरे हे सोमवारी सायंकाळी गावावरून परत आल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी चोरीची पोलिसांमध्ये तक्रार दिली. यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आहे.
वर्ध्यातील सिव्हिल लाईन एरिया असलेला या भागात सर्व शासकीय कार्यालय आणि शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान या परिसरात आहे. चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारीच चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे. यापूर्वी काही महिन्याअगोदरच चोरट्यांनी बोरगांव मेघे परिसरात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरात चोरी केली होती. याप्रकरणातील चोर अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती आहे.